पुणे – मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या दीप्ती काळे या महिला आरोपीने ससून रुग्णालयाच्या 8 व्या मजल्यावरून उडी मारल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ती पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पडली असावी अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या प्रकरणाने शहर पोलीस दलासह शहरात खळबळ उडाली आहे. तिला मोक्का लावल्यानंतर काही तासातच ही घटना घडली
दीप्ती सरोज काळे असे मृत्यू झालेल्या महिला आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्ययात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांच्यावर सराफ व्यवसायिक बळवंत मराठे यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होता.
आरोपी दीप्ती काळेची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यात ती पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. तर कालच तिच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. बांधकाम व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 46 गुंठे जागा नावावर करून घेत आणखी 56 गुंठे जागा द्यावी यासाठी धमकावत असे अशी तक्रार आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, आजच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजच या टोळीवर मोक्काची कारवाई केली होती. या टोळीची प्रमुख दीप्ती काळे ही होती. दरम्यान, रुग्णालयाच्या बाथरूम मधून खाली उडी मारली असल्याचे सांगितले जात आहे. यात गंभीररित्या जखमी झाल्याने काळे हिचा जागीच मृत्यू झाला आहे.
दीप्ती काळे (४२) नवीन इमारतीमध्ये आठव्या मजल्यावर दाखल होती. मंगळवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तिने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसाना अंघोळीसाठी जाते असे सांगितले. नंतर प्रसाधनगृहात गेली. त्यानंतर तिने खिडकीच्या काचा सरकवून पाईपला धरून बाहेर पडली. त्यानंतर खाली उतरण्याच्या प्रयत्नात आठव्या मजल्यावरून duct मधून खाली पडली.
दरम्यान अंघोळीसाठी गेल्यानंतर बराच वेळ झाला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी दरवाजा ठोठावला मात्र आतून प्रतिसाद आला नाही. पोलिसानी दरवाजा तोडून आत गेले असता खिडकी सरकावल्याचे निदर्शनास आले. आरोपी दीप्ती तोपर्यंत पसार झाली होती. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता दीप्ती गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले अशी माहिती परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली. सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, सहायक आयुक्त चंद्रकांत सांगळे, बंडगार्डन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी घटनास्थळी भेट दिली.