Pune Crime News : पुण्यातील कुख्यात आंदेकर-कोमकर टोळ्यांमधील गँगवॉर पुन्हा एकदा रक्तरंजित वळणावर पोहोचला आहे. वनराज आंदेकर हत्याप्रकरणातील एका आरोपीच्या भावावर बुधवारी सकाळी पुण्यातील बालाजीनगर परिसरात गोळीबार करण्यात आला. आंदेकर टोळीच्या शूटरांनी केलेल्या या हल्ल्यात वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपी असलेला आकाश मस्केचा भाऊ बाळा मस्केचा खून झाला आहे. या घटनेमुळे पुणे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पुण्यातल्या बालाजी नगरच्या बस स्टॉपवर ही धक्कादायक घटना घडली आहे. आंदेकर-कोमकर गँगवॉरमधील हा चौथा खून मानला जात असून, गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर, त्याची मुलगी आणि सून सध्या तुरुंगात असतानाही टोळीचे कारनामे सुरूच असल्याची चर्चा रंगली आहे. तुरुंगातूनच टोळीची सूत्रे हलवली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (Pune Crime News) पोलिस तपासानुसार, आंदेकर टोळीने नेहमीप्रमाणेच हत्या घडवून आणण्यासाठी अल्पवयीन आणि तरुण मुलांचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या गँगवॉरची सुरुवात 2025 मध्ये झाली होती. पुण्यातील गणेशपेठ भागात वनराज आंदेकर याची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वनराज आंदेकरच्या बहिणी आणि मेहुण्याचा सहभाग असल्याचा आरोप होता. त्यानंतर आंदेकर टोळीने बदला घेण्याची मोहीम सुरू केली. काही महिन्यांपूर्वी वनराज आंदेकरच्या बहिणीचा मुलगा आयुष कोमकर याची घरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर कात्रज-घोलेवाडी परिसरात कोमकर टोळीशी संबंधित शिंदे नावाच्या व्यक्तीचा खून करण्यात आला. बुधवारी झालेली बालाजीनगरमधील हत्या ही त्याच सूडसत्राचा भाग असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, आंदेकर कुटुंबातील अनेक सदस्य तुरुंगात असतानाही त्यांचा राजकीय प्रभाव कायम असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे गुन्हेगारी आणि राजकारणाच्या संबंधांवरही पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बालाजीनगर गोळीबार प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, संबंधित शूटरचा शोध सुरू आहे. हेही वाचा : Sleep: वयानुसार झोपेची गरज बदलते! नवजात बाळापासून ज्येष्ठांपर्यंत कोणाला किती तास झोप आवश्यक?