Pune Crime: जमीन बळकाण्यासाठी बनावट उतारा सादर करून न्यायालय आणि शासनाची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा

पुणे – जमिनीवर ताबा दाखविण्यासाठी न्यायालयात बनावट आठ-अ उतारा सादर करत शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना जांभूळवाडी, कोळेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी बाळासाहेब जांभळे, जालिंदर जांभळे, प्रभाकर जांभळे आणि दोन महिला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अजय जांभळे (32, रा. आंबेगाव खुर्द ) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दिली आहे.
जांभूळवाडी सर्व्हे नंबर 67 मिळकतीच्या 7-12 उताऱ्यावर अजय जांभळे आणि कुटुंबीयांचा मालकीहक्क आहे. त्यामध्ये स्वतःचा ताबा दाखवण्यासाठी बाळासाहेब जांभळे, जालिंदर जांभळे आणि माजी सरपंच असलेल्या महिलेसह इतरांनी ग्रामपंचायत जांभुळवाडी-कोळेवाडी येथे स्वतःच्या नावावर घर असल्याबाबत खोटा 8-अ उतारा बनविला. त्यानंतर अजय यांच्या जमिनीची मोजणी होऊ नये, यासाठी आरोपींनी 2018 मध्ये भूमी अभिलेख कार्यालयात तो खोटा उतारा खरा भासवला. शिवाय, दिवाणी न्यायालय, पुणे येथे दावा दाखल केला.
उताऱ्यावरील काही जमीन बाळासाहेब, जालिंदर, प्रभाकर आणि दोन महिलांचा ताबा असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यासाठी त्यांनी खोटा आणि बनावट नमुना 8-अ उतारा दाखवून न्यायालयासह अजय जांभळे यांची फसवणूक केली. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड यांनी सांगितले.





