Pune Crime : औषध विक्रेत्याची 10 लाख रुपयांची फसवणूक

पुणे – औषध विक्रेत्यास थेट औषधे पुरवितो, असे सांगून अनोळखी व्यक्तीने विक्रेत्याची 10 लाख रुपयांची औषधांची फसवणूक केली. याप्रकरणी एका महिलेविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शशिकांत फड (वय 43, रा. सुस रोड, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फड हे औषध विक्रेते आहेत. त्यांचे बुधवार पेठेमध्ये आदितेय फार्मासुटीकल्स नावाचे दुकान आहे. फिर्यादी यांना विक्रीसाठी लागणारी औषधे ते एका औषध कंपनीकडून खरेदी करीत होते.
दरम्यान, त्यांनी एका मध्यस्थामार्फत दुसऱ्या कंपनीकडून औषधे घेण्यास सुरूवात केली. मध्यस्थामार्फतच एका महिलेशी त्यांनी फोनद्वारे संवाद साधला. त्यावेळी संबंधित महिलेने 25 टक्के रक्कम भरल्यास औषधे पाठवून देऊ असे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून दहा लाख 52 हजार 800 रुपये इतकी रक्कम घेतली.
पैसे दिल्यानंतरही फिर्यादीस आवश्यक औषधांचा साठा प्राप्त झाला नाही. त्यांनी पाठपुरावा केला, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.





