Pune Crime: पुण्यात नोकरीच्या बहाण्याने कोट्यवधींची फसवणूक: बनावट महसूल सचिव आणि क्लार्कला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे – महसूल विभागात सचिव असल्याची बतावणी करत सहायक क्लार्कच्या साथीने सरकारी नोकरीचे आमिष दाखवत दोघांनी 30 जणांना आर्थिक गंडा घातला. महसूल, वनविभाग, पोलिस खात्यात क्लास वन,क्लास टू ची नोकरी मिळवून देतो असे सांगून एक लाखापासून 20 लाख रुपयापर्यंत या जोडीने पैसे उकळे आहेत. तरुणांना विश्वास वाटावा म्हणून दोघांनी चक्क बनावट नियुक्ती पत्रे देखील तयार केली आहेत.
गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने तोतया सचिव आणि पुणे तसहसीलदार कार्यालयात नियुक्तीस असलेल्या महसूल सहायक क्लार्कला बेड्या ठोकल्या आहेत. महादेव बाबूरा दराडे (32,रा. व्हाईट फिल्ड सोसायटी काळा खडक वाकड), रणजीत लक्ष्मण चौरे (.35,रा.धायरी) अशी दोघांची नावे आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील सुरज कैलास पाचपुते (.22) या तरुणाला पोलिस उपनिरीक्षक पदी नोकरी लावतो म्हणून आरोपी दराडे याने दहा लाख रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे पाचपुते याच्या लक्षात आल्यानंतर त्याने याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दराडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाकडे देण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ यांच्या पथकाने दराडेला वाकड परिसरातून ताब्यात घेतले.
दराडे हा रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करतो. त्याला महसूल विभागाची चांगलीच माहिती आहे. कामानिमित्ताने शासकीय कार्यालयात ये जा असल्याने तो अनेकांना महसूल सचिव असल्याचे सांगत होता. पोलिस, महसूल, वन विभागात वर्ग एक, वर्ग दोन आणि वर्ग तीनच्या पदावर अनेकांना नोकरी लावल्याचे सांगत होता. दराडे इस्टेट एजंट म्हणून काम करत असल्यामुळे त्याला पैशाची गरज पडत असे. त्यातूनच त्याने तरुणांना ठगविण्याचा धंदा सुरू केला. कोणाकडून एक लाख, पाच लाख आणि 20 लाख रुपयार्यंत त्याने पैसे घेतले. पैसे दिल्यानंतर नोकरी मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर तरुण त्याच्याकडे पैसे मागण्याचा तगादा लावत असत. त्यावेळी तो एक दोन लाख रुपये परत देत असे. जे कोणी जास्त मागे लागतील त्यांचे पैसे देखील देऊन टाकत होता.





