प्रभात वृत्तसेवा पुणे – शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिकवणी चालकाला विशेष न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. संजय रमेश शर्मा (वय ५६, रा. जगतापनगर, वानवडी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. शाळकरी मुलगी शर्माकडे शिकवणीला जायची. ३ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत शर्माने शाळकरी मुलीला धमकाविले. मुलीच्या बहिणीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर अत्याचार केले. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली, शर्मा याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी यांनी करून शर्माविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.सरकार पक्षाकडून सरकारी वकील नितीन कोंघे यांनी बाजू मांडली. आरोपी शर्माने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, शिक्षकी पेशाला काळिमा फासणार आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकील कोंधे यांनी युक्तिवादात केली. पीडित मुलीची साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने शर्मा याला २० वर्षे सक्तमजुरीसह ३७ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास नऊ महिने सश्रम कारावारासाची तरतूद न्यायालयाने केली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन कामकाज पार पाडण्यात आले. दिनेश जाधव यांनी न्यायालयीन कामकाजात सहाय केले.