Pune Crime : लोहगावमध्ये घरफोडी! रोकड-मोबाइल-लॅपटॉपसह ५ लाखांचा ऐवज पळवला
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे – बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, मोबाइल, लॅपटॉपसह ५ लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १८ ते २२ सप्टेंबर कालावधीत लोहगावमधील गोविंद रेसीडेन्सीमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वडगाव शिंदे रस्ता, लोहगावमधील गोविंद रेसीडेन्सीत राहायला आहे.
१८ ते २२ सप्टेंबर कालावधीत संबंधित कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. त्यावेळी फ्लॅट बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून मोबाइल, लॅपटॉप, रोकडसह ५ लाख ३० हजारांहून अधिक रकमेची चोरी केली. त्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड पुढील तपास करीत आहेत.



