Pune Crime : बिबवेवाडी हत्याकांड! अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी द्या, सरकारी वकिलांचा मागणी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – बिबवेवाडी येथे २०२१ मध्ये एकतर्फी प्रेमातून पंधरा वर्षांच्या राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी विशेष सरकारी वकील हेमंत झंजाड यांनी न्यायालयात केली. ‘आरोपीने मुलीचा गळा चिरून खून केला. तिचा मृत्यू झाल्यानंतरही आरोपीने तिच्यावर चाकू व कोयत्याने तब्बल २२ वार केले. अशा क्रूर व्यक्तीला कोणतीही दयामाया न दाखविता फाशीची शिक्षा द्यावी,’ असा जोरदार युक्तिवाद झंजाड यांनी केला.
या प्रकरणी आरोपी शुभम उर्फ ऋषीकेश बाजीराव भागवत (वय २२) याच्याविरोधात खून करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, शस्त्रास्त्र कायदा व मुंबई पोलिस कायद्याच्या विविध कलमांनुसार आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्याच्याविरोधात खून झालेल्या मुलीच्या चुलत बहिणीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना १२ ऑक्टोबर २०२१ रोजी बिबवेवाडीतील यश लॉन्स येथे घडली होती. मृत मुलगी आठवीत होती. तिने प्रेमास नकार दिल्याने, तसेच फोनवर बोलणे टाळल्याच्या रागातून आरोपीने तिच्यावर चाकूने २२ वेळा वार करून निर्घृण खून केला, असे तक्रारीत नमूद आहे.
पुण्यासह राज्यभरात खळबळ माजविलेल्या या क्रूर घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले होते.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये सरकार पक्षातर्फे अंतिम युक्तिवाद करण्यात आला. हा दुर्मिळातील दुर्मीळ गुन्हा आहे. या प्रकरणात एकूण बारा साक्षीदारांनी साक्ष नोंदविली आहे. त्यापैकी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपीला न्यायालयात ओळखले असून, निर्भिडपणे साक्ष नोंदविली आहे.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीवर आरोपी कोयत्याने वार करीत होता, हे सांगताना प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना अश्रू अनावर झाले नव्हते. मृत मुलगी आईवडिलांचे एकुलते एक अपत्य होती. संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देणे योग्य राहील. त्यामुळे समाजात असे गुन्हे करणाऱ्यांना एक कठोर संदेश जाईल,’ असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील झंजाड यांनी केला. या प्रकरणात आता १६ ऑक्टोबरला बचाव पक्षातर्फे अंतिम युक्तिवाद केला जाणार आहे.




