Pune Crime : चाकूचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील दागिने लुटणाऱ्याला अटक

पुणे – मजूर काम करणाऱ्या महिलेला काम देण्याच्या बहाण्याने कानिफनाथ डोंगराजवळ नेत तिच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. यानंतर तिला चाकूचा धाक दाखवून अंगावरील सोन्याचे दागिने लुटून फरार झालेल्या एकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली.
आरोपी गुन्हा केल्यानंतर कर्नाटक येथील त्याच्या मूळ गावी पळून गेला होता. कोंढवा पोलिसांनी त्याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने कर्नाटक येथून जेरबंद केले.
श्रीनिवास गणेश जाधव (३०, रा. थेरगाव, जगतापनगर, पिंपरी. मूळ रा. रायचूर, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत कोंढव्यातील ४५ वर्षीय मजूर महिलेने फिर्याद दिली होती. ही घटना १ सप्टेंबर रोजी घडली होती. तक्रारदार महिला कोंढवा येथे वास्तव्यास असून बिगारी काम करते. जाधव याने महिलेला कोंढवा खुर्द येथून कानिफनाथ डोंगराजवळ गवत कापण्यासाठी म्हणून सोबत नेले. त्याठिकाणी गेल्यानंतर तिच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले.
तिला चाकूचा धाक दाखवून कानातील सोन्याचे वेल आणि पायातील चांदीच्या पट्ट्या जबरदस्तीने काढून घेत आरोपी पसार झाला होता. सदर घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील यांच्या सुचनेप्रमाणे अंंमलदार किशोर वळे, ज्योतीबा पवार, निलेश देसाई यांनी कोंढवा ते वाकड, काळेवाडी, थेरगाव मजुरअड्डा िंपपरी चिंचवडपर्यंत रस्त्यावरील सीसीटीव्हींची तपासणी केली.
या दरम्यान संशयीत आरोपी हा थेरगाव मजुरअड्डा, काळेवाडी येथून आल्याचे समजले. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तपास केल्यानंतर त्याचे नाव श्रीनिवास जाधव असून तो थेरगाव येथे राहत असून त्याचे मूूळ गाव रायचूर, कर्नाटक असल्याचे समोर आले. त्यानूसार त्याचा शोध सुरू होता. तपासाकामी कोंढवा पोलिसांनी दोन पथके तयार करून थेरगाव आणि कर्नाटकातील मूळ गावात रवाना केली. यातील एका तपास पथकाला तो मूळ गाव रायचूर येथे असल्याचे समजले. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई रमेश गरूड, निलेश वनवे, तुषार आल्हाट, लक्ष्मण होळकर यांच्यासह कर्मचायांनी केली.





