Pune Crime | ७% परताव्याचं आमिष आणि…गुंतवणूकदाराची एक कोटी ९२ लाखांची फसवणूक

प्रभात वृत्तसेवा
पुणे – गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने १ कोटी ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाला अटक केली. सचिन विलास कांबळे (वय ४२, रा. थेरगाव, पिंपरी-चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत एका व्यावसायिकाने विमानतळ पोलिसांत फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळे आणि तक्रारदार व्यावासायिकाची गेल्या वर्षी ओळख झाली होती. कांबळेने लोहगाव परिसरात खासगी कार्यालय सुरू केले होते. तक्रारदार व्यावसायिक लोहगाव भागात राहायला आहे.
आरोपीने व्यावसायिकाला गुंतवणुकीवर सात टक्के परताव्याचे आमिष दाखविले होते. व्यावसायिकाने सुरुवातीला ३३ लाख ८० हजार रुपये गुंतविले. तक्रारदार आणि परिचितांनी कांबळेकडे एकूण एक कोटी ९२ लाख ९५ हजार रुपये गुंतवणुकीस दिले. सुरुवातीला परताव्यापोटी काही रक्कम दिली. त्यानंतर कांबळेने त्यांना परतावा देणे बंद केले. त्याबाबत विचारणा केल्यानंतर कांबळेने टाळाटाळ केल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणुकदारांनी तक्रार अर्ज दिला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शरद शेळके तपास करत आहेत.





