Pune Crime: “रेशनचा तांदूळ’ बेकायदेशीर विक्रीसाठी घेऊन जाणारे ‘3 ट्रक पकडले’, 97 लाखाचा 800 क्विंटल तांदूळ ‘जप्त’

पुणे – अवैधरित्या तब्बल 800 क्विंटल तांदूळाची वाहतूक करणार्या तीन ट्रकवर गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने हडपसर येथे कारवाई केली. हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी तब्बल 97 लाख 44 हजारांचे तांदळाच्या पोत्याने भरलेले ट्रक यावेळी जप्त करण्यात आले.
युनिट 2 च्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले व कर्मचारी स्वारगेट हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार गजानन सोनूने व कादीर शेख यांना तांदळाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची बातमी मिळाली. ते ट्रक हडपसर येथील 15 नंबर येथे येणार असल्याचेही त्यांना समजले.
शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास श्री कानकलक्ष्मी अग्रो ट्रेडर्स , जय आनंद फूड इंडस्ट्रीज आणि मुबारक ट्रासपोर्ट च्या मालकांनी अवैधरित्या शासकीय तांदूळ मिळवला होता. तसेच तो तांदूळ ते पांढरा, पिवळ्या व लाल अशा वेगवेगळ्या रंगाच्या पोत्यात भरून वाहतूक करत असताना आढळून आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी तांदूळ वाहतूक करण्यासाठी जीएसटीच्या बनावट पावत्या तयार केल्याचे आढळून आले. तीन ट्रक मध्ये रेशनिंग करिता असलेला तांदूळ छुप्या पद्धतीने खुल्या बाजारात बेकायदेशीर रित्या विक्री करिता खोपोली येथे जात असल्याची अधिकची माहितीही त्यांना तपासात समजली.
ट्रकवर कारवाई करून ते जप्त केल्यानंतर तपासणी केली असता त्यामध्ये 97 लाख 44 हजार रूपये किंमतीचा तब्बल 800 क्विंटल तांदूळ असल्याचे प्रकार समोर आला. संबधीतांवर फसवणूक आणि संगणमत व अत्यावशक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3,7 प्रमाणे कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप-आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस अंमलदार किशोर वग्गू, संजय जाधव ,मोहसीन शेख यांनी केली.





