Pune Crime : पुण्यात तरूणीला “रॉ’ ची भीती दाखवून उकळले 10 लाख

पुणे – तरूणीला अमेरिकन इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगून तिच्यावर भारतातील रॉ ची नजर असल्याची भीती दाखवून एकाने 9 लाखांची रोकड आणि आयफोनसह 10 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली. औंध परिसरात एप्रिल ते 7 जुलै या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी अमित चव्हाण ( वय 30) याला ताब्यात घेण्यात आले आहे. 28 वर्षीय तरूणीने पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी फॅशन डिझायनर आहे. अमितने काही दिवसांपुर्वी बेटर हाफ सोशल मीडियाद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर राहूल पाटील असे खोटे नाव सांगूकन ओळख वाढल्यानंतर त्याने फिर्यादीला अमेरिकेत इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगत दुबई, अमेरिका, भारतात देखरेखीखाली असल्याची बतावणी केली.
भारतामध्ये आम्ही तपासासाठी आलो आहोत. तुझ्यावर रॉ ची नजर आहे, अशी भीती त्याने तिला दाखविली. त्यानंतर अमितने मोबाईल आणि लॅपटॉपमधील माहिती नष्ट करण्यास सांगून तिच्याकडून वेळोवेळी रक्कम ऑनलाईन घेतली. त्यामध्ये रोकडसह 1 लाख 28 हजार रुपयांच्या लॅपटॉपचा समावेश आहे.
याविषयी चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे म्हणाले, त्या व्यक्तीने तरूणीसोबत संपर्क साधून ओळख वाढविली. त्यानंतर त्याने अमेरिकेत इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगून तरूणीवर रॉ ची नजर असल्याची भीती घालून मोठ्या रक्कमसह लॅपटॉप घेतला. यासंदर्भात आरोपीला ताब्यात घेतले असून, आणखी तपास सुरू आहे.





