Pune: भेसळखोरांविरुद्ध धडक मोहीम

पुणे – गणेशोत्सव काळात अन्न आणि औषध प्रशासन पुणे कार्यालयामार्फत पुणे विभागामध्ये अन्न आस्थापनेच्या १०१ तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये दूध, खवा, पनीर, स्वीट मावा, तूप, बटर आणि नमकीन इत्यादी पदार्थांचे ११७ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यामध्ये शहरात एकूण ९ लाख १९ हजार ५२० रुपयांचा, तर पुणे जिल्हा आणि विभागात मिळून १४ लाख ३५ हजार ९५८ किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
उत्सव काळात प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कायद्याप्रमाणे कारवाई केली. भेसळीच्या संशयावरुन अन्न पदार्थांच्या धाडी टाकत जप्ती करण्यात आली. या कालावधीमध्ये पुणे कार्यालयाने गाईचे तूप, भेसळयुक्त बटर, स्वीट खवा आणि वनस्पती इत्यादी अन्न पदार्थाचा एकूण ५ लाख १६ हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
संबंधित कारवाई अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयातील सर्व सहायक आयुक्त या अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यामार्फत सह आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन राज्य पुणे तसेच आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली पार पडण्यात आली.
तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक
सणासुदीच्या दरम्यान विक्री करण्यात येणाऱ्या अन्न पदार्थामध्ये भेसळी संदर्भात काही संशय असल्यास नागरिकांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८००-२२२-३६५ यावर संपर्क साधावा असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे पुणे यांनी केले आहे.





