Pune: नृत्यशिक्षकास न्यायालयीन कोठडी; कर्वेनगर येथील बाललैंगिक शोषण प्रकरण

पुणे – कर्वेनगर येथील नामांकित शाळेत अल्पवयीन बालकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या नृत्य शिक्षकाला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे या नृत्यशिक्षकाला ४ जानेवारीपर्यंत येरवडा कारागृहात राहावे लागणार आहे.
याप्रकरणी ३९ वर्षांच्या नृत्यशिक्षकाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत संपल्याने आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून, त्याचा सखोल तपास करायचा आहे, तसेच साक्षीदारांकडे चौकशी करायची आहे. त्यानंतर आरोपीविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करायचे आहे. त्यासाठी आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी वारजे माळवाडी पोलीस आणि सरकारी वकिलांनी केली.
बचाव पक्षातर्फे ऍड. सुचित मुंदडा आणि ऍड. विक्रम कदम यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकल्यावर न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. दरम्यान, जामिनासाठी अर्ज दाखल केला जाणार आहे, असे त्याचे वकील ऍड. सुचित मुंदडा यांनी सांगितले.
आरोपीवर लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम ३, ४, ६, ८, ११, १२, १५ कलमांसह भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ नुसार वारजे माळवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार २०२२ ते ९ डिसेंबर २०२४ या कालावधीत कर्वेनगर येथील एका नामांकित शाळेत घडला. या शाळेच्या संस्थाचालकालाही पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.





