पुणे: वैद्यकीय उपचारांवर पालिका खर्च करणार 119 कोटी

शहरी गरीब, पालिका कर्मचारी तसेच आजी-माजी सदस्यांचा समावेश
पुणे – महापालिकेकडून शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांसह, पालिकेचे आजी-माजी कर्मचारी तसेच आजी-माजी नगरसेवकांच्या उपचारांसाठी तब्बल 118 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक 60 कोटींचा निधी शहरी गरीब योजनेच्या लाभार्थींसाठी असणार असून 50 कोटींचा निधी महापालिकेच्या आजी-माजी कर्मचारी, तर 9 कोटींचा निधी माजी तसेच भावी 173 नगरसेवकांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या योजनेचे लाभार्थी ज्या खासगी रुग्णालयात उपचार घेतली त्या रुग्णांलयांची बिले या निधीतून दिली जाणार आहेत.
महापालिका आयुक्तांच्या 2022-23 च्या अंदाजपत्रकात हा खर्च प्रस्तावित केला आहे. त्यानुसार, शहरी गरीब वैद्यकीय योजने अंतर्गत 60 कोटींचा निधी देण्यात आला. त्यात 34 गावांमधील नागरिकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. 2021-22 मध्ये या योजनेत 1 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या 14 हजार 950 कार्ड देण्यात आली होती. त्यातील 14 हजार 400 जणांनी या योजनेचा लाभ घेतला असून सुमारे 45 कोटींचा खर्च झाला आहे. मात्र, या वर्षी आणखी 23 गावे पालिकेत आल्याने योजनेचा खर्च 15 कोटींनी वाढवित 60 कोटी करण्यात आहे.
नगरसेवकांसाठी 9 कोटी
माजी तसेच नव्याने येणाऱ्या नगरसेवकांसाठीही अंदाजपत्रकात 9 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत सुमारे 218 माजी सभासद असून त्यात नुकत्याच कार्यकाळ संपलेल्या सुमारे 160 सदस्यांची वाढ झाली आहे. नव्याने अस्तित्वात येणाऱ्या महापालिकेत 173 सदस्य असणार आहेत. त्यातील काही सदस्य पुन्हा निवडून येणार असल्याने हा आकडा कमी होणार असला तरी आजी-माजी नगरसेवकांच्या उपचारासाठी 9 कोटींचा निधी ठेवण्यात आला आहे.





