Pune : ‘व्हॉइस ऑफ देवेंद्र’वरून विद्यापीठात वादंग; आमदार पवार आणि एनएसयूआयच्या आक्षेपानंतर परिपत्रक मागे

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आयोजित व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेच्या परिपत्रकावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज मोठा वाद निर्माण झाला. विद्यापीठाने कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या नावाचा प्रचार करणे अयोग्य असल्याचा तीव्र आक्षेप आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर नोंदवला. त्यानंतर नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) केलेल्या आंदोलनामुळे अखेर विद्यापीठ प्रशासनाने नमते घेत हे वादग्रस्त परिपत्रक मागे घेतले.
काय होते परिपत्रकात?
विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी हे परिपत्रक प्रसिद्ध केले होते. राज्याचे माननीय मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून ही स्पर्धा आयोजित केली जात आहे, असे त्यात म्हटले होते. विकसित महाराष्ट्र या मुख्य विषयावरील ही स्पर्धा युवकांमध्ये नेतृत्व आणि वक्तृत्व कौशल्ये विकसित करण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ ठरेल, असेही नमूद केले होते. या परिपत्रकाद्वारे संलग्न महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले होते.
रोहित पवारांचा सवाल
आमदार रोहित पवार यांनी एक्स या समाजमाध्यमावर आक्षेप नोंदवत पोस्टमध्ये म्हटले, की विद्यापीठाने राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचे नसते, याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतो. विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी, तसेच व्हॉइस ऑफ डेमोक्रॉसी मजबुतीसाठी प्रयत्न केले, तर अधिक योग्य राहील. त्यांच्या या आक्षेपानंतर विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला.
स्पष्टीकरण आणि माघार
पवार यांच्या आक्षेपानंतर आणि एनएसयूआयच्या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी एक नवीन पत्रक प्रसिद्ध करून खुलासा केला. व्हॉइस ऑफ देवेंद्र या स्पर्धेचे आयोजन विद्यापीठाने केले नव्हते, असे सांगत केवळ माहितीसाठी प्रसिद्ध केलेले मागील परिपत्रक मागे घेत असल्याचे जाहीर केले.





