Pune : सय्यदनगरमध्ये दूषित पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

हडपसर – सय्यदनगर परिसरातील अनेक गल्ल्यांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार जडत असल्याने अनेकांना डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे. महापालिका पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.सध्या दूषित पाण्यामुळे शहरात जीबीएस या आजाराची रुग्णसंख्या वाढत असताना. सय्यदनगर भागात होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे, असा आरोप माजी नगरसेवक फारुकभाई इनामदार यांनी केला आहे.
सय्यदनगर येथील गल्ली क्रमांक 12 ,14 17 ,19 ,24 ,27 येथे गेली दोन महिन्यांपासून होत असलेल्या दूषित पाणीपुरठ्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असतानादेखील पाणीपुरवठा विभागातील अधिकारी नागरिकांच्या तक्रारी वेळेवर सोडवत नसल्याचा आरोप माजी नगरसेवक फारुकभाई इनामदार यांनी केला आहे.
सय्यदनगर भागातील बहुतांशी गल्ल्यांमध्ये वीस-वीस वर्षांपूर्वीच्या जुन्या पाण्याच्या लाईन आहेत.त्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे ड्रेनेजचे पाणी त्या लाईनमध्ये जाऊन नागरिकांना ते पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन लाईन टाकण्यात याव्या यासाठीची मागणी समान पाणी पुरवठा विभाग, लष्कर पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार केली. परंतु ,या ठिकाणी कोणतेही काम केले गेले नाही. एक-दोन ठिकाणी काम सुरू केले व ते अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आले आहे.असेही इनामदार यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. पाण्याला उग्र वास येतो आहे. त्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुले नेहमी आजारी पडतात. पाणी पिण्याची इच्छा होत नाही. महापालिका प्रशासनाने या प्रकाराकडे लक्ष देऊन आमच्या पाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी येथील नईम अन्सारी ,यासीन अन्सारी, याकूब अन्सारी, ताजुद्दीन सय्यद रशुद्दीन सय्यद, रियाजुद्दीन सय्यद आदींसह सय्यद नगर मधील नागरिकांनी केली आहे.
याबाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंता अश्विनी लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की येथील पाण्याच्या लाईन या अनेक वर्षांपूर्वी केलेल्या आहेत. त्या जुन्या असल्याने काही ठिकाणी जीर्ण झाल्या आहेत. याशिवाय सय्यदनगर मधील अनेक गल्लीमध्ये सांडपाणी व पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या एकाच ठिकाणी असल्याने गळती लागलेल्या वाहिन्यांद्वारे सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीत मिसळत असल्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे, असे दिसल्यास त्या लाईन दुरुस्त करून घेतल्या जात आहेत. तसेच पूर्ण लाईनच वॉश केली जात आहे.नवीन लाईन टाकण्याच्या कामाला मान्यता मिळाली असून काही ठिकाणी काम सुरू करण्यात येत आहे.
‘सय्यदनगर मधील अनेक गल्लीमध्ये दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार बहुतांश रहिवाशांनी आपल्याकडे केली होती. येथील लाईन जुन्या आहेत.त्या बदलण्यात यावे यासाठी गेली सहा महिन्यापूर्वीच मागणी केली होती. परंतु ,महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे .या भागाला कोणी वालीच नसल्यासारखे वातावरण आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. या भागातील ड्रेनेजमधून पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन गेल्याने हा प्रकार सुरू झाला आहे. या पाण्यामुळे स्थानिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते; तर जीबीएस आजाराचा धोकाही संभवतो आहे,’ – फारुखभाई इनामदार माजी नगरसेवक.





