फुरसुंगी – फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेसाठी जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीमधील गोंधळ कायम आहे. उरुळी देवाची गावातील प्रभाग क्र. १६ मध्ये एकाच पत्त्यावर ३१ विविध जाती-धर्मातील मतदारांची नावे आढळून आली आहेत. याप्रकरणी हरकत नोंदविण्यात आली असून संबंधित बोगस नावे कमी केली गेली नाही तर तीव्र जनआंदोलन छेडू, असा इशारा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख व माजी सरपंच उल्हास शेवाळे यांनी दिला आहे. फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये नाव, पत्ता व प्रभागांमध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे येथील रहिवाशांनी १८ हजार २३४ हरकती दाखल केल्या आहेत. ९ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदारयादीमध्ये एकाच घरातील मतदारांची नावे विविध प्रभागात आढळून आली आहेत. मोठ्या संख्येने दुबार व स्थलांतरितांची नावे यादीत समाविष्ट आहेत, काही ठिकाणी दोन प्रभागांच्या लोकसंख्येतही मोठी तफावत पाहायला मिळत आहे. काही मतदारांची नावे यादीत सापडली नाहीत. नाव, पत्ता, फोटो यामध्येही अनेक चुका आढळून आलेल्या आहेत. सद्यस्थितीत प्रशासनाकडून या हरकती निवारण करण्याचे काम सुरू असून ३१ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी, प्रशासनाने तातडीने मतदारयादी दुरूस्त करून बोगस नावे कमी करावीत, अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे. …अन्यथा आंदोलन ‘प्रारुप मतदारयादीत उरुळी देवाची गावातील प्रभाग क्र. १६ मध्ये एका ठिकाणी एकाच पत्त्यावर ३१ विविध जाती धर्मातील मतदारांची नावे आली आहेत, ही नावे बोगस असून या पत्त्यावर या नावांचे कोणतेही मतदार राहत नाही याची आम्ही खात्री केली आहे, तरी प्रशासनाने ही बोगस नावे यादीतून कमी करावीत अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारला लागेल.’- उल्हास शेवाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी सरपंच, उरूळी देवाची