Pune : भूगाव येथील बाह्यवळण रस्ता तातडीने पूर्ण करा; गडकरींचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निर्देश

पुणे – पुणे-पौड-कोलाड राष्ट्रीय महामार्गावरील भूगाव येथील बाह्यवळण रस्त्याच्या गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या कामाला अखेर गती मिळाली आहे. पुढील नऊ महिन्यात या बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) दिले. त्यामुळे हिंजवडी, पिरंगुट तसेच कोकणात जाणााऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नुकतीच पुण्यात महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत घेऊन प्रलंबित आणि निर्धारीत रस्ते विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी प्रलंबित असलेल्या भूगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामाबाबत त्यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.
याविषयी माहिती देताना महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले की, भूगाव बाह्यवळण या रस्त्याची एकूण लांबी ८६० मीटर असून, रुंदी १८ मीटर असेल. हा चार पदरी रस्ता असून, तो राष्ट्रीय महामार्ग (एनएच ७५३ एफ) जोडला जाईल. या कामासाठी एका कंपनीला १५ कोटी ३० लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.
पावसाळ्यामुळे काम सुरू करण्यास विलंब होत असून, एका महिन्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. त्यापूर्वी मंजुरी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. सुमारे नऊ महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पासाठी एकूण १.६७ हेक्टर जमिनीचे भूसंपादन अपेक्षित असताना १.५५ हेक्टर (९५ टक्के) जमिनीचे भूसंपादन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) केले आहे.
प्रकल्पातील ४१ बाधितांपैकी ३७ जणांनी पीएमआरडीएला भूसंपादनासाठी सहमती दर्शवली आहे. त्यानुसार भूसंपादनासाठी बाधितांना चटई क्षेत्र निर्देशांक आणि हस्तांतरण विकास हक्क (टीडीआर) यासारखे मोबदले देउन जमिनींचा आगाऊ ताबा घेण्यात आला आहे, असेही कदम यांनी सांगितले.





