पुणे – कोंढवा येथील संगणक अभियंता कथित बलात्कारप्रकरणी पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे. पीडितेच्या मोबाईलची तांत्रिक तपासणीही झाली आहे. दरम्यान, पीडितेचा १६४ नुसार न्यायालयात जबाब नोंदवला आहे. गुन्हा चालविण्यासाठी पोलिसांकडे पुरेसा पुरावा आहे का, पुरेसा पुरावा नसल्यास पोलीस न्यायालयात खटला बंद करण्यासाठी क्लोजर रिपोर्ट दाखल करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानंतर खटला बंद करण्याविषयीचा निर्णय न्यायालय घेत असते. कोंढवा येथील बलात्कार प्रकरण देशभर गाजले. मात्र, २४ तासांतच ते बनावट असल्याचे उघड झाले. दरम्यान, पीडितेनेही रागाच्या भरात तक्रार दिल्याचे म्हटले आहे. मात्र, दाखल झालेला गुन्हा गंभीर असल्याने तो पोलिसांना तपासावरच ठेवावा लागतो. पीडितेने जर न्यायालयात जबाब नोंदवला, तरच न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे गुन्ह्याची फाइल बंद करता येते. यामुळे पोलीस न्यायालयाच्या निर्देशाची वाट पाहात आहेत. तपास झाला असला, तरी दोषारोपपत्र दाखल करण्यास पुरेसा वेळ असल्याने पोलीस दोषारोपपत्र दाखल करण्याची घाई करणार नाहीत. दोन्ही कुटुंबांत चर्चा दरम्यान, कथित पीडिता आणि आरोपीच्या कुटुंबांमध्ये चर्चा झाली असून, दोन्ही बाजूंनी प्रकरण मिटवून घेण्याची तयारी आहे. मात्र, यात पोलीस कोणतीही भूमिका घेऊ शकत नाही. जे काही होईल ते न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणेच होईल. पीडितेच्या मोबाइलमध्ये काही धक्कादायक बाबी आढळल्या आहेत. यामुळे तिच्या पालकांनीही डोक्याला हात लावला आहे. वर्षभरापूर्वीही केली होती तक्रार पीडितेने वर्षभरापूर्वी ऑनलाइन फसवणूक झाल्याची तक्रार नजीकच्या एका पोलीस ठाण्यात केली होती. खाद्यपदार्थ व इतर अनेक वस्तू ती सरसकट ऑनलाइन मागवत असते, तसेच आरोपीही ऑनलाइन ऑर्डन देऊन तिच्या पत्त्यावर पार्सल पाठवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड या प्रकरणात साक्ष नोंदवलेली प्राध्यापक महिला ही पीडितेची फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड आहे. जेव्हा पोलिसांनी जबाबाला बोलावले, तेव्हा तिला मोठा धक्का बसला होता. हे प्रकरण एवढे मोठे होईल, असे तिला वाटले नव्हते. एफआयआर लिहिण्यासाठीही तिने पीडितेला मार्गदर्शन केले होते.