Pune : महापुरूषांच्या वाटेने जायला सामान्य माणूस कचरतो – डॉ. मोहन भागवत

पुणे – महापुरूषांच्या वाटेने जायला सामान्य माणूस कचरतो. मात्र, आपलेपणाची वाट चोखाळणाऱ्या माणसांना तो आप्त समजतो. या आपलेपणानेच सर्वांचे जीवन उजळून निघावे, त्यासाठी कर्तृत्त्व खर्च करून स्वतःचेही जीवन उजळून टाकण्याची प्रेरणा समाजाला पुढे नेते. त्यातूनच समाजाचे परिवर्तन घडते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी केले.
आयुर्वेद भास्कर कै. वैद्य परशुराम य. वैद्य खडीवाले तथा दादा यांच्या उत्तुंग जीवनकार्याच्या आढावा घेणाऱ्या दर्शन योगेश्वराचे – आयुर्वेद भास्कर दादा वैद्य खडीवाले या चरित्रग्रंथाचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. शां.ब.मुजुमदार, वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले, संगीता विनायक वैद्य खडीवाले, डॉ. राजीव ढेरे उपस्थित होते.
आयुष्यात त्यांनी जनकल्याण रक्तपेढीसह जे अनेक सामाजिक आणि विविध प्रकल्प केले, असे डॉ. मुजुमदार म्हणाले.
विनायक खडीवाले, संगीता खडीवाले यांनी मनोगत व्यक्त केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजीव ढेरे यांनी आभार मानले.
आयुर्वेदाचे विद्यापीठ नाही : डॉ. शां.ब.मुजुमदार
आयुर्वेद शास्त्रात पुणे हे नेहमीच अग्रगण्य राहिले आहे. आयुर्वेदाचे अनेक जाणकार आणि ज्यांनी आयुर्वेदासाठी आयुष्य वेचले, अशा दिग्गज व्यक्ती पुण्यात आहेत. पुण्यात आजमितीस ३० विद्यापीठे आहेत. आयुर्वेद शास्त्राची मोठी परंपरा पुण्यात असूनही पुण्यातच काय महाराष्ट्रात आयुर्वेदासाठी विद्यापीठ नाही, अशी खंत डॉ. शां.ब.मुजुमदार यांनी व्यक्त केली. राजस्थान आणि गुजरात मध्ये मात्र विद्यापीठ आहे. पुण्यामध्ये आयुर्वेद विद्यापीठाची नितांत आवश्यकता आहे, अशी अपेक्षा डॉ. मुजुमदार यांनी व्यक्त केली.





