पुणे – महापालिकेवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण, बांधकाम तसेच आकाशचिन्ह विभागाकडून शहरात जोरदार कारवाई होत आहे. मात्र, ही कारवाई ठराविक अतिक्रमणांवरच होत असून राजकीय नेत्यांनी केलेल्या अतिक्रमणांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच, कारवाई करताना कोणताही दुजाभाव करू नये, तक्रारी आल्यानंतर त्यानुसार कारवाई करावी, अशा सूचना स्वत: महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. मात्र, त्यानंतरही अतिक्रमण विभाग ठराविक ठिकाणीच कारवाईचा बुलडोझर फिरवत असल्याने पुन्हा कारवाईबाबत बैठक घेऊन सूचना केल्या जातील असा पुनरोच्चार महापालिका आयुक्तांनी केला आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशाचीच अंमलबजावणीला हरताळ फासत असल्याचे चित्र आहे. शहरात मोठ्या प्रमाणात प्रमुख रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणांच्या जागांवर अतिक्रमणे झालेली आहेत. ही अतिक्रमणे कोणतीही पर्वा न करता काढली जावीत, असे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. मात्र, हे आदेश अतिक्रमण विभागाच धाब्यावर बसत असून हितसंबंधातील अतिक्रमणांना तसेच माजी नगरसेवकांनी पदपथावर केलेल्या अतिक्रमणांकडे पाहिलेही जात नसल्याचे चित्र आहे. अनेक नगरसेवकांनी तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क पदपथावर कार्यालये, नागरी सुविधा केंद्र तसेच दुकाने थाटली असून त्यांच्यावर कारवाई करण्यास अतिक्रमण विभाग आखडता हात घेत आहे. या उलट केवळ दिखावूपणासाठी इतर ठिकाणी कारवाई होत असल्याचे शहरभर चित्र आहे. फेर आढावा घेणार… महापालिका आयुक्तांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना, जर अतिक्रमण विभाग अशाप्रकारे कारवाई करत असेल तर हे चांगले नाही असे सांगत नाराजी व्यक्त केली. हे प्रकार रोखण्यासाठी तसेच तक्रार आलेल्या सर्व ठिकाणी कारवाई करण्यासाठी तसेच कारवाईत कोणताही भेदभाव न करता सरसकट कारवाईसह नगरसेवकांची अथवा कार्यकर्त्यांची रस्त्यावरील कार्यालयेही काढली जातील याच्या स्पष्ट सूचना पुन्हा अतिक्रमण विभागाची बैठक घेऊन देणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे यापूर्वी आयुक्तांनी दिलेले आदेशच अतिक्रमण विभाग पाळत नसल्याने आयुक्तांना पुन्हा आढावा घेण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे.