Pune : तीन वर्षांपासून बंद; ई-लर्निंग पुन्हा सुरू होणार

पुणे – मोठ्या गाजावाजा करीत महापालिकेच्या शाळांमध्ये सुरू केलेली पुणे ई-लर्निंग प्रणाली गेली तीन वर्षांपासून बंद आहे. इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे ही शैक्षणिक सुविधा ठप्प झाल्याचे समोर आले असून, सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत आहे. यामुळे प्रशासनाकडून ही प्रणाली पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून महापालिका आयुक्तांच्या वाॅर रूम मधील प्रमुख प्रकल्पांमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे.
महापालिकेने खासगी संस्थांच्या सहकार्याने काही वर्षांपूर्वी ई-लर्निंग उपक्रम सुरू केला होता. त्यानंतर २६५ शाळांमध्ये सर्व वर्गखोल्यांमध्ये स्क्रीन बसवून ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली. शिवाजीनगर येथील शिक्षण मंडळाच्या मुख्य कार्यालयातून सॉफ्टवेअरद्वारे दृक-श्राव्य पद्धतीने शिक्षण दिले जात होते. मात्र, करोना काळात शाळा बंद राहिल्यामुळे ई-लर्निंग थांबले आणि त्यानंतर इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे ती प्रणालीच बंद झाली.
सुमारे सव्वातीन वर्षांपासून महापालिकेत प्रशासक राज आहे. नगरसेवकांची अनुपस्थिती आणि आमदार, खासदारांच्या दुर्लक्षामुळे या काळात ई-लर्निंगसाठी कोणताही पुढाकार घेण्यात आला नाही. परिणामी, २६५ शाळांतील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना या प्रणालीचा कोणताही लाभ मिळत नाही. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने या प्रकल्पाचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. महापालिका आयुक्तांनी ई-लर्निंग प्रणाली असलेल्या शाळांमधील ही सेवा तातडीने पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी ही माहिती दिली.





