Pune : दुय्यम निबंधक पदाचा पदभार लिपिकांकडे नको

पुणे : नोंदणी व मुद्रांक दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणीची जबाबदारी दुय्यम निबंधकाकडे असते. येथील दुय्यम निबंधकांची पदे रिक्त असतात, तसेच दुय्यम निबंधक रजेवर जातात त्यावेळी दुय्यम निबंधक या पदाचा तात्पुरता पदभार लिपिकाकडे देण्यात येतो. अशावेळी काही लिपिकांकडून दस्तनोंदणीमध्ये काही चुका झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक पदाचा पदभार लिपिकांकडे देऊ नये, अशा सूचना राज्य शासनाने नोंदणी महानिरीक्षक यांना दिल्या आहेत.
नोंदणी व मुद्रांक विभागातील सह दुय्यम निबंधक वर्ग-२ , सह जिल्हा निबंधक वर्ग-२ , मुद्रांक उप अधिक्षक या संर्वगाची एकूण मंजूर पद संख्या २६० इतकी आहे. तर वर्ग-२ संवर्गामध्ये ८५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त असणाऱ्या तसेच रजेच्या कालावधीत रिक्त असणाऱ्या पदांवर वरिष्ठ लिपिकांना व जर वरिष्ठ लिपीक नसेल तर, कनिष्ठ लिपीक यांना पदभार देण्यात येतो. परिणामी, प्रभारी सह दुय्यम निबंधक यांना कायद्याचे परिपूर्ण ज्ञान नसल्यामुळे त्यांच्याकडून दस्ताऐवज नोंदणीमध्ये अनेक चुका होताना दिसून येत आहे.
त्याचप्रमाणे त्यांच्याकडे दस्ताऐवज नोंदणीसाठी येणारे पक्षकार, वकील, त्यांच्यावर दबाव आणून दस्ताऐवजाची बेकायदेशीर नोंदणी करुन घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकारामुळे कर्मचाऱ्यावर अतिरिक्त ताण येऊन चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदणी केली जाते. त्यामुळे महसुलाचे नुकसान झाल्याचे तसेच बेकायदेशीर पद्धतीने नोंदणी केल्यामुळे पक्षकारांनाही अनेक वेळा मनस्ताप झाल्याच्या तक्रारी शासनाकडे आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर सह दुय्यम निबंधक वर्ग-२ , सह जिल्हा निबंधक वर्ग-२ किंवा मुद्रांक उप अधीक्षक या संर्वगाच्या रिक्त पदांचा तसेच रजेवर असणाऱ्या अधिकाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ लिपिक वा कनिष्ठ लिपिक यांना देऊ नये. तर या पदाचा पदभार दुय्यम निबंधक श्रेणी -1 या संवर्गातील कर्मचाऱ्यांना देण्यात यावा. कोणत्याही दस्त नोंदणी कार्यालयात दुय्यम निबंधक पदाचा पदभार वरिष्ठ अथवा कनिष्ठ लिपिक यांच्याकडे दिला असेल तर त्यांचा पदभार तत्काळ काढून घेण्यात यावा. अशा सूचना महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी सुनिल जाधव यांनी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांना दिल्या आहेत.




