Pune City | वंदे भारत शेगावला थांबणार ; रेल्वे प्रवाशांच्या मागणीला मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल..

प्रभात वृत्तसेवा
पुणे – नागपूर (अजनी)- पुणे वंदेभारत एक्स्प्रेस रविवार (दि. १०) पासून सुरू झाली आहे. मात्र, या गाडीला शेगाव येथे थांबा मिळावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून करण्यात आली. त्याला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता देत, वंदेभारत एक्सप्रेसला शेगाव येथे थांबा देण्यास मंजुरीचे पत्र दिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर-पुणे वंदे भारत ट्रेनला रविवारी हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि वंदेभारत पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. या रेल्वेने पुणे-नागपूर प्रवास १२ तासांमध्ये होणार असून, प्रवासांचा तीन तास वेळ वाचणार आहे. या गाडीला वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड कॉर्ड लाइन या ठिकाणी यापूर्वीच थांबा देण्यात आला आहे.
आता त्यामध्ये शेगाव स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धैर्यशील वंडेकर यांनी मागणी केली होती.शेगाव हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून, राज्य, तसेच देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात. येथे थांबा दिल्यास प्रवाशांची सोय होईल. पुणे-शेगाव वंदे भारत एक्स्प्रेसची मागणीही गेले काही वर्षे प्रवासी करत आहे. मात्र, ती मिळत नसल्याने नागपूर-पुणेएक्स्प्रेसला शेगाव थांबा द्यावा, अशी मागणी प्रवासी करत होते. या निर्णयामुळे लोणार सरोवरसारख्या वर्ल्ड हेरिटेज साइटला भेट देणाऱ्यांचीही सोय होणार आहे.





