Pune City | फिरती लोकअदालतीतून झटपट न्याय ; पुणे जिल्ह्यातील १७० प्रकरणे निकाली

प्रभात वृत्तसेवा
पुणे – न्याय हा केवळ न्यायालयाच्या चार भिंतींमध्ये मर्यादित न राहता, तो थेट नागरिकांच्या दारी पोहोचविणे, ही काळाची गरज ओळखून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने न्याय आपल्या दारी या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत फिरती लोकअदालतीसाठी विशेष मोबाइल व्हॅन सुरू करण्यात आली आहे. याद्वारे जिल्ह्यातील १७० प्रकरणांचा निकाल लावण्यात आला असून, एकूण १ कोटी ५४ लाख ७७ हजार ८२ रुपयांची सेटलमेंट करण्यात आली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या व्हॅनने १२ जूनपासून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्र आणि कॅन्टोन्मेंट परिसरात कार्य सुरू केले. त्यानंतर २३ जून पासून पुणे जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांमध्ये प्रवास केला. या प्रत्येक ठिकाणी स्थानिक न्यायालयाचे न्यायाधीश व कर्मचारी यांनीही मोबाइल लोकअदालतीच्या बेंचमध्ये सहभाग घेतला. जेणेकरून न्याय कार्य अधिक प्रभावी, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पार पडले.
या उपक्रमात एकूण १७० प्रकरणे निकाली काढण्यात आली, ज्यात व दिवाणी व फौजदारी स्वरूपाची १३० प्रकरणे सोडविण्यात आली आणि त्यातून एकूण १,४९,४१,३३२ रुपयांची रक्कम सेटल करण्यात आली. ३६ पूर्ववादाची (प्री- लिटिगेशन) प्रकरणे निकाली काढून ५,३५,७५० इतकी रक्कम सेटल करण्यात आली. सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश. ए. के. पटणी यांच्या मार्गदर्शनाखाली, विधी स्वयंसेवक प्रमोद बानसोडे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत कायदेशीर समज वाढवण्याचे काम केले, तर चालक व विधी स्वयंसेवक दत्तात्रय बारभुजे यांनी संपूर्ण जिल्ह्यात ही व्हॅन वेळेत पोहोचवण्यासाठी मेहनत घेतली.





