Pune City | पुणेकरांच्या सहनशक्तीची परीक्षा ; सिंहगड रस्त्यावर सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – एकीकडे रस्त्यावर पडलेले खड्डे, दुसरीकडे उड्डाणपुलाच्या कामामुळे अरुंद झालेला रस्ता, त्यात वाहतूक कोंडीच्या वेळी गैरहजर असलेले वाहतूक पोलीस आणि वॉर्डन या सर्व कारणांमुळे सलग तिसऱ्या दिवशी सिंहगड रस्त्यावर धायरीपासून ते राजाराम पुलापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यामध्ये भर म्हणून उड्डाणपुलाच्या कामाजवळ एकाच वेळी दोन पीएमपी बस बंद पडल्याने स्थिती अधिकच गंभीर झाली. परिणामी, १० ते १५ मिनिटांत होणारा प्रवास तब्बल तासाभरावर गेल्याने वाहन चालकांकडून महापालिका आणि पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच, उद्घाटनासाठी नेत्यांची वाट न पाहता तातडीने काम पूर्ण करून कोंडीमधून सुटका करावी, अशी मागणी होत आहे.
बंद बसमुळे रांगा वाढल्या..
हिंगणे चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असताना याच रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी सकाळी साडेनऊच्या सुमारास एकाच वेळी दोन पीएमपी बस बंद पडल्याने रस्ता पूर्ण बंद झाला. परिणामी, वाहतूक कॅनॉल रस्त्याने वळवण्यात आली. मात्र, अवघ्या अर्ध्या तासात मुख्य सिंहगड रस्ता आणि कॅनॉल रस्ता दोन्ही पूर्णपणे बंद झाले. वाहनचालकांनी अंतर्गत रस्त्यांचा पर्याय वापरायचा प्रयत्न केला. मात्र, ते रस्तेही पूर्णपणे बंद झाले. बंद पडलेल्या बसेस हटवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी खासगी क्रेनचा वापर केला. त्यापैकी एकच बस बाजूला करता आली, तर दुसरी बस क्रेनने हलवता आली नाही. त्यामुळे पीएमपीची ब्रेकडाऊन व्हॅन बोलावण्यात आली, पण ती पोहोचण्यास जवळपास दीड तास लागला. तोपर्यंत प्रचंड कोंडी झाली होती.
महापालिकेचे दुर्लक्ष..
उड्डाणपुलाच्या शेवटी रॅम्पच्या ठिकाणी मोठा पदपथ आहे, त्यावर महावितरणचे खांब आहेत. फूटपाथवर अतिक्रमणे आहेत. त्यामुळे तेथे अवघा साडेपाच ते सहा मीटर रस्ता उरतो. त्यातच, रस्त्यावर खड्डे आहेत. पालिकेकडून आधी या भागात फूटपाथ कमी करून रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करणे आवश्यक होते. तसेच, रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी झाडे काढणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. आता, पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात असूनही प्रचंड कोंडी होत आहे. पुलाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, उद्घाटनासाठी राजकीय नेत्यांच्या वेळेची प्रतीक्षा केल्याने काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
“बंद पडलेल्या बसमागे वाहनांच्या रांगा लागल्या. विश्रांतीनगर पेट्रोल पंप येथे ही एक पीएमपीएल बस बंद पडली होती. मात्र, ती खासगी क्रेनने हलवण्यात यश आले. दरम्यान येथेच एक मोठा खड्डा पडला आहे, त्यामध्येही वाहने अडकून पडली होती. शेवटी हा खड्डा वाहतूक पोलिसांनी बुजवला.”
– सुनील गवळी, पोलीस निरिक्षक, सिंहगड रस्ता वाहतूक विभाग





