Pune City | रक्षाबंधन दिवशी महिलांसाठी पीएमपीचा लकी ड्रॉ उपक्रम; मिळणार पैठणी आणि मोफत पास

प्रभात वृत्तसेवा
पुणे – रक्षाबंधन दिवशी पीएमपीने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी पीएमपीकडून लकी ड्राॅ योजना हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये दि. ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनला १७ विजेत्या महिलांना पैठणी आणि एक महिन्याचा मोफत पास बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे, तरी या उपक्रमात महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी केले.पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रात पीएमपीकडून सेवा दिली जाते. त्यामध्ये दररोज ११ ते १२ लाख प्रवाशी प्रवास करतात. त्यामध्ये ४ ते ५ लाख महिला प्रवासांची संख्या आहे.
या महिलांसाठी पीएमपी अध्यक्ष पंकज देवरे यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनदिवशी लकी ड्राॅ उपक्रम घेण्यात आला आहे.दि. ९ ऑगस्ट रोजी वाहकाकडून घेतलेले प्रिंटेड तिकीट, दैनंदिन पास, यूपीआयद्वारे किंवा मोबाईल ॲपवरून काढलेले तिकीट, दैनंदिन पास असलेल्या महिला प्रवाशांनाच यामध्ये सहभाग घेता येईल. योजनेतून एकूण १७ महिला विजेत्यांची निवड संगणकीकृत सोडत पद्धतीने होईल. दरम्यान, या उपक्रमात पीएमपीचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सहभागी होता येणार नाही. सर्व अधिकार पीएमपीकडे असतील तर विजेत्यांची नावे व सोडतीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कसा घ्यायचा सहभाग..
-बसमध्ये लावण्यात आलेला क्यूआरकोड स्कॅन करून ऑनलाइन फॉर्म भरणे.
-स्मार्टफोन नसलेल्या महिला प्रवाशांनी वाहकाकडून कुपन घेऊन आवश्यक माहिती भरून बसमधील बॉक्समध्ये टाकावी.
-एका तिकीटासाठी एकाच मोबाईल नंबरवरून सहभाग घेता येईल.
-ऑनलाइन/ऑफलाइन फॉर्मवर तिकीट क्रमांक व आधार कार्डवरील शेवटचे चार अंक नमूद करणे आवश्यक.
-चुकीची/अपूर्ण माहिती दिल्यास किंवा तिकीट/दैनंदिन पास सादर न केल्यास बक्षीस नाही.





