Pune City | धार्मिक स्थळांसाठी पीएमपीएमएलची नवी ‘बस सेवा क्र. १२’ सुरू

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या पर्यटन बससेवेला मिळणारा प्रतिसाद पाहता महामंडळाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या आसपासच्या धार्मिक स्थळांसाठी नवी बससेवा क्रमांक १२ ची सुरुवात करण्यात आली. ही नवी बससेवा पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी ८.३० वाजता निघेल आणि माळशिरसचे श्रीक्षेत्र भुलेश्वर, हिवरे येथील प्रतिक्षेत्र त्रिंबकेश्वर, सासवडचे श्रीक्षेत्र संगमेश्वर आणि चांगावटेश्वर, श्रीक्षेत्र नारायणेश्वर, श्रीक्षेत्र बनेश्वर या ठिकाणी भेट दिल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता पुणे स्थानकावर माघारी येईल.
मंगळवारी या बसमार्गावर ३ बसेसना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या वेळी पीएमपीएमएलचे मुख्य व्यवस्थापक सतीश गव्हाणे, वाहतूक नियोजन अधिकारी नारायण करडे, जनसंपर्क अधिकारी किशोर चव्हाण आदी उपस्थित होते.पूर्वी ही बससेवा फक्त शनिवार आणि रविवारच्या दिवशी सुरू होती. यापुढे बुकिंग झाल्यास आठवड्याचे इतरही दिवस या पर्यटन सेवा उपलब्ध असणार आहेत.





