Pune City | कायद्याला नवी ताकद ; पुण्यात ५ ठाणे आणि २ पोलीस उपायुक्तांची भर..

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था आणखी भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच नवीन पोलीस ठाण्यांची घोषणा करतानाच याकरीता दोन नवीन पोलीस उपायुक्त पदांचीही घोषणा केली आहे. त्यामुळे आता शहर पोलीस आयुक्तालयात एकूण ७ पोलीस परिमंडळे होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.सध्या, सायबर पोलीस ठाण्यासह पुणे शहर पोलीस आयुक्तालयात ४० पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. या ५ नवीन ठाण्यांमुळे हा आकडा ४५ वर जाणार आहे.
नवीन पोलीस ठाण्यांसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल आणि शासकीय आदेशानंतर भरती प्रक्रिया सुरू होईल, असेही आयुक्त कुमार यांनी सांगितले. एका परिमंडळात ६ पोलीस ठाणे हा निकष असल्याने, ४२ ठाण्यांसह ७ पोलीस परिमंडळे तयार होतील. दोन परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक ठाणे जास्त असेल.सध्या, पुण्यातील ५ परिमंडळांपैकी परिमंडळ ४ आणि ५ मध्ये गेल्या वर्षी ७ नवीन ठाण्यांची भर पडली असून त्यामुळे कार्यभार वाढला आहे. नवीन परिमंडळे झाल्यानंतर त्यांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. शासनाने मागील ३ वर्षांत पुणे शहर पोलीस दलासाठी १,००० कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले असून, १५० नवीन वाहने आणि पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीसाठी २०० कोटींची मान्यता मिळाल्याने दलाची क्षमता वाढणार आहे.





