प्रभात वृत्तसेवा पुणे – आदिवासींचे देशाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. त्यांनी जपलेले पारंपरिक ज्ञान आजच्या काळातही औषधी वनस्पतींच्या संवर्धनात आणि पर्यावरण रक्षणात उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन कुलगुरु डाॅ. सुरेश गोसावी यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, क्रांतीवीर बिरसा मुंडा अध्यासनाचे समन्वयक डॉ. अविनाश आडे, अधिष्ठाता डॉ. सुप्रिया पाटील, अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे, कृष्णा भंडलकर, गणपत नागरे, डॉ. विलास आढाव, डॉ. सदानंद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. काळकर यांनी आदिवासी संस्कृतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पारंपरिक ज्ञानाचा वारसा हस्तांतरण करत असल्याचे नमूद केले. डॉ. आडे म्हणाले, आदिवासी समुदायाने अस्तित्व व अस्मिता यासाठी विविध परकीय आक्रमणांच्या विरोधात परखड लढा दिला तसेच क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी उलगुलान सारख्या आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील युवकांना एकत्रित करून ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्यासाठीही प्रखर लढा दिला.