Pune City | बेघरांना हक्काची घरे द्या ; अडसूळ यांचे अधिकाऱ्यांना निर्देश..

प्रभात वृत्तसेवा
पुणे – जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील बेघर नागरिकांना हक्काची घरे देण्याला गती द्यावी. एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, असे आदेश राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी दिले.सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय राबवत असलेल्या विविध योजनांची आढावा बैठक व्हीव्हीआयपी विश्रामगृहात झाली. यावेळी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे, समाजकल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे अन्य अधिकारी उपस्थित होते.
बेघर नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास, रमाई, झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्प आदी योजना राबविण्यात येतात. विविध योजनांसाठी नगरपरिषदांनी सर्वेक्षण करावे, जागा मागणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावे, घरकूल योजनांचा निधी खर्च करावा, अशा सूचनाही अडसूळ यांनी दिल्या.अनुकंपा तत्वावर पात्र कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती द्यावी, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, पदोन्नतीचे प्रश्न मार्गी लावावे, असेही त्यांनी नमूद केले.





