Pune City | शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची चक्क रस्त्यावर..

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांतील काही शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून बदली व इतर शासकीय लाभ मिळवले असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे. यासंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी वारंवार विनंत्या करूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे संघटनेच्या दिव्यांग कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची उचलून थेट रस्त्यावर आणत आंदोलन केले. या आंदोलनामुळे जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली.
बोगस प्रमाणपत्र वापरणाऱ्या शिक्षकांची यादी तत्काळ जाहीर करावी, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, यासाठी प्रहार संघटनेच्या नेत्या सुरेखा ढवळे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्याकडे वारंवार लेखी स्वरूपात मागणी केली. मात्र, शिक्षण विभागाकडून याबाबत कोणतीही ठोस माहिती दिली गेली नाही. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हा परिषद कार्यालयात येत शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीचा ताबा घेतला आणि ती खुर्ची उचलून थेट रस्त्यावर आणली. नंतर रस्त्यावर ठिय्या आंदोलन करीतदिव्यांग कार्यकर्त्यांनी शिक्षण विभागाच्या विरोधात घोषणाबाजी केली.





