Pune City | सीबीएसईचा मोठा निर्णय ; पुस्तकं, नोट्स घेऊनच नववीची परीक्षा..

प्रभात वृत्तसेवा
पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने विद्यार्थ्यांचा परीक्षेबाबतचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता नववीसाठी आता ओपन बुक पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी पुस्तके, नोट्स आणि संदर्भ ग्रंथ सोबत ठेवण्याची आणि त्यांचा वापर करण्याची मुभा मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सीबीएसई बोर्डाने टप्प्याटप्प्याने शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केलेली आहे. इयत्तानिहाय नवीन अभ्यासक्रमाबरोबर परीक्षा पद्धतीतही बदल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये सीबीएसईने इयत्ता नववी ते बारावीसाठी ओपन बुक असेसमेंट या मूल्यांकन पद्धतीचा एक पायलट अभ्यास सुरू केला होता. या अभ्यासात विद्यार्थ्यांची कामगिरी तपासण्यात आली. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचा, वर्गातील नोट्सचा आणि ग्रंथालयातील पुस्तकांचा उपयोग करण्यात अडचणी येत होत्या.
पायलट अभ्यासामध्ये काही अडचणी आल्याचे मान्य करण्यात आले. ही नवी पद्धत विद्यार्थ्यांमध्ये चिंतनशील विचारांना चालना देणार असल्याची बाबही पुढे आहे. शिक्षकांचा सकारात्मक दृष्टिकोन विचारात घेऊन सीबीएसईच्या गव्हर्निंग बॉडीने ओपन बुक पद्धतीने परीक्षा घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता ओपन बुक परीक्षांसाठी नमुना प्रश्नपत्रिकाही तयार करण्याला सुरुवात होणार आहे. सीबीएसई बोर्डाकडून ओपन बुक परीक्षा पद्धतीबाबत शाळा, शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या जाणार आहेत.
पाठांतराची आवश्यकताच नाही..
आता ओपन बुक परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना पाठांतरावर भर देण्याची आवश्यकता भासणार नाही. त्याऐवजी विषयांच्या संकल्पना समजून संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. विद्यार्थ्यांना विषयांची सखोल माहिती मिळण्यास मदत होणार असून, त्यांचे आकलन, कौशल्यही अधिक सुधारणार असल्याचे काही शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले.





