Pune City | कृषी उत्पन्न बाजार समितीने सेसवाढीसाठी नवीन प्रस्ताव

प्रभात वृत्तसेवा
पुणे – कृषी उत्पन्न बाजार समितीने सेसवाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचा भाग म्हणून भुसार विभागात ज्या वस्तूंवर बाजार फी (सेस) घेतली जात नाही, अशा सर्व वस्तूंवर एक टक्का ‘युजर चार्जेस’ (वापर आकार) आकारण्यासाठी समितीने पणन संचालकांकडे फेरप्रस्ताव दिला आहे. यामुळे वर्षाकाठी १७ ते १८ कोटींनी उत्पन्न वाढणार आहे.मार्केट यार्डातील भुसार विभागात विविध ५ हजारांपेक्षा जास्त वस्तू येतात. यामध्ये फक्त ६० ते ६५ वस्तुंवरच बाजार फी म्हणजे सेस आकाराला जातो.
यामुळे बासमितीच्या उत्पनात वाढ होत नव्हती. राज्य सरकारने कृषि माल नसलेल्या मालावर युजर चार्जेस घेण्यासाठी कायद्यात बदल करून परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सेस नसलेल्या मालांवर युजर चार्जेस लावून उत्पन्न वाढविता येईल. याच आधारे कृषी उत्पन्न बाजार समितीने युजर चार्जेस लावण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. गुळ भुसार विभागात दररोज २०० ते २२५ वाहनांमधून १००० ते १५०० टन मालाची आवक होते.
२०१४ ला शासनाने सुकामेवा, रवा, अटा, मैदा, तेल, डालडा यासह विविध वस्तुंवरील सेस रद्द केली होती. त्यानंतर कायद्यात बदल झाल्याने बाजारातील अनियमित शेतीमालावर युजर चार्जेस लावून उत्पन्न वाढविता येणार आहे. हा प्रस्ताव पणन संचालकांकडे प्रलंबित आहे. भुसार बाजाराचे सेसचे उत्पन्न सध्या वर्षाला ३० कोटी आहे. .
“युजर चार्जेस प्रस्ताव पणन संचालकांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. जो शेतमाल नियमांमध्ये नाही त्या व्यापारावर युजर चार्जेस लावण्याचा निर्णय आहे. त्यानुसार १ रुपयांपर्यंत युजर चार्जेस लावण्याचे अधिकार पणन संचालकांच्या मंजुरीने बाजार समित्यांना दिलेले आहेत.”
-डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे





