Pune City | मध्य पुण्यात वाहतुकीचा नवा अध्याय ; शनिवारवाडा-स्वारगेट भुयारी मार्ग प्रस्तावित..

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये भुयारी मार्गांच्या निर्मितीसाठी नियोजन करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे शनिवारवाडा ते स्वारगेट भुयारी मार्गांच्या निर्मितीला गती मिळणार आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या भुयारी मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे भुयारी मार्ग तयार झाल्यानंतर मध्यवस्तीत होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोठी मदत होणार आहे, अशी माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली.
शहराच्या वाहतुकीला गती देण्यासाठी विविध योजना राबविण्यासाठी चाचपणी केली जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये संख्येने कमी, तसेच छोटे रस्ते असल्याने वाहतूक कोंडी सोडविताना अडचण येत आहे. त्यामुळे या भागामध्ये भुयारी मार्गांचे जाळे निर्माण करण्यासाठी नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना केली असल्याचे रासने यांनी सांगितले.





