Pune : ई हक्क प्रणालीला नागरिकांची पसंती; जिल्ह्यातील 13 तालुक्यांतून 1 लाख 21 हजार 899 अर्ज

पुणे – सातबारा उताऱ्यावरील वारसनोंद, कर्ज बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालक कर्ता), एकत्र कुंटुंब मॅनेजर (एकुमॅ) नोंद कमी करणे आदींसाठी भूमिअभिलेख विभागाने ई हक्क प्रणाली विकसित केली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येतो.
जिल्हा प्रशासनाने ई हक्क प्रणालीद्वारेच अर्ज करण्याचे आवाहन केल्यानंतर नागरिकांही चांगला प्रतिसाद दिला असून, मागील नऊ महिन्यांत ई हक्क प्रणालीद्वारे जिल्ह्यातील 13 तालुक्यांतून 1 लाख 21 हजार 899 नागरिकांनी विविध नोंदीसाठी अर्ज केले. यातील 98 हजार 215 नोंदी मंजूर झाल्या आहेत.
महसूल विभागाने अधिकाधिक सुविधा ऑनलाइन उपलब्ध करुन दिल्या आहेत. डिजिटल सातबारा उतारा, ई फेरफार अशा प्रमुख सुविधांचा यामध्ये समावेश आहे. आता याच्या पुढील पाऊल म्हणजे वारसनोंद, कर्जाचा बोजा दाखल करणे आदी नोंदींसाठी ई हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.
मयत व्यक्तीनंतर त्यांच्या वारसाची नोंद घेण्यासाठी नागरिकांना pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगइग करून अर्ज करावा लागेल. हा अर्ज संबंधित गावच्या तलाठ्यांकडे जाईल. ते पडताळणी करतील. अपूर्ण कागदपत्राची माहिती अर्जदाराला मेलद्वारे कळविण्यात येईल. सर्व कागदपत्रे पूर्ण असल्यास तलाठी त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर घेणार आहेत.
याबाबत कुळकायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी सांगितले, ऑगस्ट 2025 पर्यंत 1 लाख 21 हजार 899 पैकी 98 हजार 215 अर्ज मंजूर झाले आहेत. 22 हजार अर्ज अपुऱ्या कागदपत्रांमुळे नाकारले असून, त्यांना कागदपत्रांची पूर्ततेच्या सूचना दिल्या आहेत. 1 हजार 604 नोंदी प्रलंबित असून, त्यासद्धा लवकर मंजूर होतील.
नागरिक स्वतः अथवा महा ई-सेवा केंद्रातून देखील अर्ज करू शकतात.
या प्रणालीच्या वापराने तलाठ्यांकडून फेरफार घेण्याचे कामकाज सुलभ होणार असून, महसूलच्या कामकाजात गतिमानता व पारदर्शकता येईल.





