Pune : जनसंपर्क क्रमांक बंद ठेवलेल्या उमेदवारांना प्रचारात नागरिकांचा थेट रोष

- जनसंपर्क क्रमांक बंद ठेवलेले उमेदवार ॲक्टिव्ह मोड वर
- प्रचारावेळी नागरिकांनी थेट रोष व्यक्त केल्याने पडले तोंडावर
हर्षद कटारिया
बिबवेवाडी : महापालिका निवडणुकीची उमेदवारी मिळाल्यानंतर अनेकांनी जुने जाहीरनामे पुन्हा नव्याने छापून घेतले. आपण, जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास वर्षभर केंव्हाही उपलब्ध असू, असे धडधडीत आश्वासन अनेकांनी गेल्यावेळीच दिले होते.
परंतु, अनेकांनी हे आश्वासन गेल्या सात-आठ वर्षांत पूर्णच केले नाही, नागरिकांना वेळच दिला नाही. आता, यावेळी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पुन्हा तेच आश्वासन छापून जुनेच उमेदवार नव्याने नव्या प्रभागात मतदारांच्या भेटीला गेले.
विशेष म्हणजे जो मोबाइल क्रमांक संपर्कासाठी होता तोच एका उमेदवाराने गेली अनेक महिने बंद करून ठेवला होता. त्यामुळे तीन वेळा निवडणूक जिंकलेले हा जनतेचा नाथ असलेले उमेदवार पुन्हा मत मागायला गेले तेंव्हा नागरिकांपुढे चांगलेच तोंडावर पडले.
महापालिका प्रशासकीय राजवटीत अनेक समस्या वाढल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोर जावे लागले. एका माजी नगरसेवकाने नागरिकांच्या समस्यांना वैतागून जनसंपर्क नंबरच ब्लॉक केले. परंतु, गतवेळी झालेल्या निवडणुकीत याच माजी नगरसेवकांनी आपण नागरिकांच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असल्याचे आश्वासन दिले होते.
परंतु, कार्यकाळ संपल्यानंतर प्रभागातील कामे प्रशासकांकडून होऊ लागली त्यातून रस्ता, पाणी, सांडपाणी वाहिन्या असल्या समस्या वाढत गेल्या, समस्या सोडविण्यात येणाऱ्या अडचणी नागरिकांना सांगता येइनात त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांनी चारचाकीला काळ्या काचा लावून घेतल्या तर अनेकांनी आपले जाहिरनाम्यात जनसंपर्कासाठीचे मोबाइल क्रमांक बंद करून ठेवले.
मात्र, यातून नागरिकांचा संताप वाढत गेला. आता, महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर हेच जुने उमेदवार पुन्हा निवडणूक रिंगणात नव्याने उतरले आहेत. परंतु, प्रचारसाठी प्रभागमध्ये फिरत असताना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहेत. प्रभागात पाणी येत नसल्याने मी तुम्हाला अनेक वेळा फोन केला.
मात्र, तुमचा फोन गेली अनेक महिने बंद असल्याची तक्रार एका नागरिकाने थेट प्रचारात उमेदवाराकडे केली. आपण, आपला जनसंपर्क बंद करून ठेवला असल्याचे या उमेदवाराच्या लक्षात आले, तेव्हा रेंज प्रॉब्लेम असेल, असे सांगत त्यांनी सारवासारवीही केली. मात्र, याची चर्चानंतर परिसरात चांगलीच रंगली.
त्यामुळे निवडून आल्यावर नागरिकांच्या समस्यांसाठी आपण चोवीस तास उपलब्ध असल्याची आश्वासने देवून जनसंपर्क क्रमांंकच बंद करून ठेवणाऱ्या अशा उमेदवारांना नागरिक यावेळी मतदान करणार का, याचे उत्तर १६ जानेवारीला मतपेटीतूनच कळणार आहे, सदर प्रसंगामुळे या प्रभागात मोबाइल ब्लॉकची चर्चा चांगलीच रंगली.





