Pune : एलआयसी पॉलिसीच्या नावाखाली नागरिकांना गंडा

पुणे : एलआयसी पॉलिसीच्या नावाखाली नागरिकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या वाकडेवाडी येथील बनावट कॉल सेंटरचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. हे कॉल सेंटर चालवणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडे पुणे परिसरातील नामांकित ३५ कंपन्यांचे बनावट रबरी शिक्के सापडले असून १५ मोबाइल, १५० सिम कार्ड आणि वेगवेगळ्या ३० बँकांची बँक खाती, चेक बुक मिळाले आहे. आरोपींनी एलआयसीच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार केले होते.
शंकर कारकुन पोखरकर (४२, रा. कात्रज), मेहफूज मेहबुब सिद्दीकी (४०, रा. औंध), अशिष रामदास मानकर (४८, रा. वाघोली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील पोखरकर हा मुख्य सूत्रधार आहे. एलआयसी एजंट असल्याचे सांगून जादा परताव्याचा आमिषाने आरोपीने २०२१ मध्ये शिवाजीनगर भागातील एकाकडून ५ लाख ४ हजार रुपये उकळले होते. काही दिवसांनी पैसे मिळतील, असे त्यांना सांगण्यात आले होते. फसवणूक झाल्यावर संबंधित व्यक्तीने २०२३ मध्ये शिवाजीनगर पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली होती. तेव्हापासून शिवाजीनगर पोलीस आरोपींच्या मागावर होते.
दरम्यान, तांत्रिक तपासावरून शिवाजीनगर सायबर पथकातील अंमलदार आदेश चलवादी, तेजस चोपडे यांनी बनावट कॉल सेंटरचा माग काढला. त्यानुसार वाकडेवाडी येथे फ्यूचर ग्लोबल सर्विस नावाने सुरू असलेल्या कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. पोलीस उपायुक्त संदीपसिंह गील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक के. बी. डाबेराव, अंमलदार नलिनी क्षिरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, गणेश जाधवर, रुचिका जमदाडे, स्वालेहा शेख, सरस्वती कांगणे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
एलआयसीच्या ग्राहकांचा मिळविला डेटा
अटक करण्यात आलेल्या आरोपींमधील एकजण यापूर्वी एलआयसी पॉलिसी काढून देण्याचे काम करीत होता. त्यातून त्याने एलआयसीचा ग्राहकांचा डेटा मिळविला. त्यावरून नागरिकांना संपर्क केला जात होता.





