Pune: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीआयडी) तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या अपघातामागे घातपात आहे का, निष्काळजीपणा झाला का, अथवा कोणते गुन्हेगारी कृत्य घडले आहे का, या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल तपास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. लिअरजेट ४५ विमानाचा अपघात- २८ जानेवारी २०२६ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) मुंबईहून बारामतीकडे ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या लिअरजेट ४५ (Learjet 45) विमानाने जात असताना बारामती विमानतळाजवळ उतरताना भीषण अपघात झाला. विमान विमानतळाशेजारील एका शेतात कोसळले आणि त्यानंतर सलग चार ते पाच मोठे स्फोट झाले. या दुर्घटनेत विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, सुरक्षारक्षक विदीप जाधव, क्रू मेंबर पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि को-पायलट कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता. घातपाताचा संशय व राजकीय आरोप – या अपघातात घातपाताचा संशय व्यक्त होताच राजकीय वातावरण ढवळून निघाले. अपघाताच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीला ऐनवेळी क्लिनचीट देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. त्याचबरोबर, विमानाचे मूळ दोन पायलट ठरलेले असताना ऐनवेळी त्यांच्यात बदल करण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी स्वतंत्र एफआयआर दाखल करण्याच्याही हालचाली सुरू असल्याचे समजते. DGCA कारवाई व सरकारी भूमिका – अपघातानंतर विमान नियामक संस्था DGCA ने व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या चार विमानांच्या उड्डाणांवर तत्काळ बंदी घातली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी १३ निर्धारित मुद्द्यांवर चौकशी सुरू असल्याचे जाहीर केले आहे. सीआयडी तपास – सदर अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याचा तपास अत्यंत बारकाईने व काटेकोरपणे करण्यात येत असल्याचे अपर पोलीस महासंचालक रामानंद यांनी स्पष्ट केले. घातपात, निष्काळजीपणा आणि गुन्हेगारी कृत्य या तीन प्रमुख शक्यतांच्या अनुषंगाने सीआयडी पथक सखोल चौकशी करत आहे. तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असेही त्यांनी सूचित केले. या पत्रकार परिषदेस पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ आणि पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील हेही उपस्थित होते.