पुणे : भिंत अंगावर पडून मुलाचा मृत्यू

येरवडा – घरातील आतील बाजूस असलेल्या कमी उंचीच्या भिंतीला लटकून झोका खेळणाऱ्या मुलाच्या अंगावर ती भिंत पडून त्याचा मृत्यू झाला. मोहंमद आरिफ खान (10) असे मुलाचे नाव असून, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.
कळस येथील खान कुटुंबातील “छकुला’ मोहंमद हा इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता. वडील रिक्षाचालक तर आई गृहिणी आणि त्याची बहीण बारा वर्षांची आहे. तसेच, आजी, चुलता-चुलती असे एकत्र कुटुंब भाड्याच्या घरात राहाते. खान यांच्या घरातील आतील बाजूस कमी उंचीची भिंत असणारी मोरी होती. या मोरीच्या भिंतीला मोहंमद लटकत खेळत असताना पावसामुळे भिंत कमकुवत झाल्याने ती मोहंमदच्या अंगावर कोसळली. या भिंतीत कडाप्पा फरशी असल्याने ती मोहंमदच्या डोक्याला लागली. जबर मार लागल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला.
मोहंमद यास कळस येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता तेथे उपचारास नकार देण्यात आला. आणखी एका दवाखान्यातही नकार मिळाला. तोपर्यंत तिसऱ्या ठिकाणी नेत असताना उशीर झाला, उपचाराआधीच मोहंमद मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मोहमदच्या अशा दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





