pune : पुणे विद्यापीठात वंदे मातरम् चा जयघोष

हजारो मोबाइलच्या फ्लॅशलाइट्सने उजाळला परिसर
pune : देशभक्तीपर गीतांची अनुभूती, मोबाइलच्या फ्लॅशलाइट्सचा तेजस्वी लखलखाट आणि हजारो युकांच्या एकसुरातील जयघोषाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला.
वंदे मातरम् कृती समिती तर्फे आयोजित यूथ की आवाज या विशेष सांगितिक कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांनी हजेरी लावत विकसित भारताचा संकल्प सोडला.
दरम्यान, एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींशी साधलेला संवाद आणि दुसरीकडे वंदे मातरम् कृती समितीतर्फे आयोजित कार्यक्रम, या दोन्ही कार्यक्रमामुळे शनिवारी शहर पूर्णपणे युवामय झाल्याचे पाहायला मिळाले.
विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या या सोहळ्यात भारत माता की जय आणि वंदे मातरम् च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सुनो गौर से दुनियावालों, जय हो आणि जय जय महाराष्ट्र माझा, यासारख्या गाण्यांनी वातावरण भारावून गेले.
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या या अजरामर गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी १८९६ च्या काँग्रेस अधिवेशनात गायलेल्या या गीताच्या ऐतिहासिक योगदानाला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी मैदानावरील दिवे मंद करून, विद्यार्थ्यांनी हातात मोबाइलच्या फ्लॅशलाइट्सची प्रकाशज्योत घेऊन वंदे मातरम्चे सामूहिक गायन केले.
काँग्रेसमधील काही लोकांनी संपूर्ण वंदे मातरम् म्हणण्याला विरोध केला. त्यांनी देशाची, क्रांतिकारकांची आणि स्वातंत्र्यासाठी लढलेल्या थोर व्यक्तींची माफी मागितली पाहिजे. संविधानाचीही माफी मागितली पाहिजे. राष्ट्रभक्त युवक संपूर्ण वंदे मातरम् म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. काँग्रेसला हे दाखवून देऊ. आपण देशाची ताकद आणि शक्ती आहात. आम्ही आपल्या सोबत आहोत.
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री





