PUNE : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बसमार्गात बदल

पुणे – साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला सारसबाग परिसरात आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. त्या पार्श्वभूमीवर या परिसरातून जाणाऱ्या 56 बस पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
पीएमपीएमएलच्या काही बस मार्गांमध्ये दुपारनंतर बदल होण्याची शक्यता आहे. सदर बाब विचारात घेता दि. 1 ऑगस्टला लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी केली जाते. यावेळी सारसबाग परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने नटराज रोड आणि सारसबाग रोड वाहतुकीसाठी बंद केला जातो. त्यामुळे जेधे चौक, सारसबाग या ठिकाणी रस्ता बंद झाल्यावर या मार्गावरून स्वारगेट डेपोसह अन्य डेपोतून येणाऱ्या बस मार्गात दुपारनंतर बदल करण्यात येणार असून, हा बदल तात्पुरत्या स्वरूपातील असेल.
यावेळी दुपारच्यावेळी लक्ष्मी नारायण टॉकीजकडून डाव्या बाजूस वळवून मित्र मंडळ चौक, सारसबाग मार्गे संचलनात ठेवण्यात येणार आहे. तसेच, स्वारगेट येथील नटराज बस स्थानकाचा रस्ता बंद झाल्यास सदर बस स्थानकावरून सुटणाऱ्या बसेस खंडोबा मंदिर, पर्वती पायथा येथून सुटतील आणि रस्ता सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे नटराज बसस्थानकाहून बसेस सुटतील.





