Pune: कर्वेनगरमध्ये चंद्रकांत मोकाटे यांचा नागरिकांशी संवाद

पुणे – कोथरूडमधून उत्तम क्रीडापट्टू तयार झाले आणि आज राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. आज मोबाइलच्या स्क्रीनमध्ये अडकलेल्या मुलांना मैदानी खेळांकडे वळविले तर नक्कीच त्यातून आणखीन खेळाडू तयार होतील, असा विश्वास व्यक्त करीत, खेळांची मैदाने टिकली पाहिजेत, त्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहील, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी व्यक्त केला.
कर्वेनगर गावठाणासह परिसरात पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.
गल्ली क्र. १ ते १० यासह परिसरात नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी काँग्रेस शहर उपाध्यक्ष विजय खळदकर, शिवसेनेचे नंदू घाटे, अजय भुवड, जगदीश दिघे, आपचे डाॅ. अभिजीत, मोरे, छाया भोसले, प्राची दुधाने, भारती भोपळे, शारदा वीर, पल्लवी नागपुरे यासह आघाडीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. या परिसरातील मुलांना खेळण्यासाठी मैदानच नाही, त्यामुळे मुलांनी खेळायचे कोठे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
त्या मैदानावर इमारती उभ्या राहत असून मैदाने वाचवली पाहिजे. त्यावर मोकाटे यांनी मैदाने टिकविण्यासाठी लवकरच मार्ग निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रचारादरम्यान नागरिकांचा मिळणार प्रतिसाद आणि महिला, वृद्ध व्यक्तींसह तरूणांकडून आपलेपणा आणि माझ्यावर विश्वास दाखवत परिसरातील मांडलेल्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी मी कटीबद्ध असल्याची ग्वाही चंद्रकांत मोकाटे यांनी दिली. दरम्यान, भेलकीनगर, अत्रेय सोसायटी, गुजरात काॅलनी, सोनार आळी आणि एकताकाॅलनीत पदयात्रेला नागरिकांची उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला.





