चांदणी चौकातून कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग 5 ऑगस्टपर्यंत बंद

पुणे : मागच्या काही दिवसांपासून राज्यात सध्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. यामुळे पुण्यातील चांदणी चौकातून कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग 5 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
या महामार्गावर आदरवाडी आणि डोंगरवाडी (ता. मुळशी) घाट परिसरातील रस्त्याला अतिवृष्टीमुळे तडे गेल्यामुळे हा रस्ता खचला आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेखातर 5 ऑगस्टपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडून देण्यात आले आहेत.
मुळशी तालुक्यात गेली दोन आठवड्यांपासून अतिवृष्टी होत आहे. अतिमुसळधार पावसामुळे रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. पिरंगुट घाटामध्ये जागोजागी दरडी ही कोसळल्या आहेत. या महामार्गावर भुगाव, भुकुम, पिरंगुट, शिंदेवाडी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठते.





