Pune : `भारती’ च्या २२ विद्यार्थ्यांना केंद्र सरकारची शिष्यवृत्ती

पुणे : केंद्र सरकारच्या सांस्कृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्राकडून कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवा कलाकारांसाठी दोन वर्षांची शिष्यवृत्ती देण्यात येते.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसचे गायन, स्वरवाद्य, तालवाद्य, कथक, भरतनाट्यम, शास्त्रीय या विषयांतील बावीस विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. तसेच तीन माजी विद्यार्थ्यांनाही ही शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.
भारती विद्यापीठाचे स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारतर्फे देशभरातील सुमारे चारशे विद्यार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपये प्रमाणे दोन वर्षांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.
विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम कला प्रदर्शनासाठी कायम प्रोत्साहित करणे, त्यांच्यासाठी कलामंच उपलब्ध करून देणे, प्रसंगानुरूप मार्गदर्शन करणे अशा जबाबदाऱ्या महाविद्यालय नेहमीच निष्ठेने पार पाडत असते.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ.विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी व संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन केले.





