पुणे | अशी स्टंटबाजी पुन्हा करू नका

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुंबई-बंगळुरू महामार्गावर कात्रज परिसरातील पडक्या इमारतीवरून धोकादायकरित्या रिल्स तयार करणाऱ्या तरुण-तरुणीला भारती विद्यापीठ पोलिसांनी बोलवून योग्य समज दिली. यापुढे अशा प्रकारे स्टंटबाजी पुन्हा करू नका, अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली आहे.
कात्रज परिसरातील स्वामी नारायण मंदिर जवळ दरीपूल नजीक एका पडक्या रिसॉर्टच्या उंच इमारतीवरुन एक तरुणी व एक तरुण धोकादायकरित्या रिल्स तयार करतानाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
पाेलिसांनी तरुण-तरुणी विराेधात भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तपास केला असता चाैकशीअंती तरुणाचे नाव मिहीर गांधी तसेच तरुणीचे नाव मीनाक्षी असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर शुक्रवारी मिहीर गांधी, मीनाक्षी यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. यावेळी दोघांनाही पोलिसांनी कडक सूचना देऊन देत यापुढे अशी स्टंटबाजी न करण्याच्या सूचना दिल्या.
त्यावेळी दोघांनीही सांगितले की, ते धावपट्टू असून रिल्स तयार करून सोशल मीडियावर टाकत असतात. आम्ही यापूर्वी अनेक रिल्स तयार केले. पण, अशा धोकादायन पद्धतीने तयार केले नसल्याचे सांगितले.
स्वामी नारायण मंदिराजवळ पडके रिसॉर्ट आहे. त्यावरून तरुण तरुणी स्टंटबाजी करत होते. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांनाही भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली.
यावेळी जीव धोक्यात घालून स्टंट करणे योग्य नसल्याची तंबी देण्यात आली आहे. अशा प्रकारे कोणीही धोकादायक पद्धतीने रील तयार करू स्वतःच्या आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात आणू नये. – दशरथ पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक





