Pune : भारती ने कौशल्य विकास शिक्षणाचे विद्यापीठ सुरू करावे

पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय हे खऱ्या अर्थाने डायमंड युनिव्हर्सिटी आहे. काळाची गरज ओळखून भारती विद्यापीठाने कौशल्य विकास शिक्षणाचे सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे. कौशल्य विकास शिक्षणाचे विद्यापीठ सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवा, त्यास कोणतीही दिरंगाई न करता तीन महिन्यांत संमती देऊ, अशी ग्वाही कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
भारती विद्यापीठातर्फे देण्यात येणारा जीवनसाधना गौरव पुरस्कार डॉ. तारा भवाळकर यांना विद्यापीठाच्या ३०वा स्थापना दिन कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत हेाते. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह, प्र-कुलगुरू, आमदार डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, कुलसचिव जी. जयकुमार, विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. एम. एस. सगरे, डॉ. के. डी. जाधव आदी उपस्थित होते. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. मिलिंद जोशी यांचा सत्कार डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
हसन मुश्रीफ म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीच्या मूल्यांकनाकरीता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत भारती विद्यापीठाला प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता सर्वांनी मिळून प्रयत्न करावे. डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही नवनवीन आव्हाने पेलायची आहेत. शिक्षणाचा उपयोग व्यवहारात करता यावा यासाठी कौशल्य विकासावर भर देण्याचा प्रयत्न विद्यापीठाद्वारे केला जात आहे. मान्यवरांचे स्वागत डाॅ. विश्वजीत कदम यांनी केले. प्रास्ताविक डॉ. विवेक सावजी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र उत्तुरकर, डॉ. ज्योती मंडलिक यांनी केले.
पदव्यासह साराजिक शहाणपणा हवा…
भारत विद्यापीठाचा वयाच्या या टप्प्यावर मिळालेला पुरस्कार प्राणवायुसारखा आहे, अशी भावना व्यक्त करीत डॉ. भवाळकर म्हणाल्या की, कागदोपत्री पदवीच्या जोडीला आवश्यक सामाजिक शहाणपण असायला हवा. सहकारातून शेती, शिक्षण, आर्थिक, वैचारिक आणि सांस्कृतिक विकास साधत भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.





