पुणे : स्मशानभूमीत आता अग्निशमन यंत्रणा

पुणे -मागील आठवड्यात कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार सुरू असताना चितेवर पेट्रोल टाकल्याने भडका उडाला होता. या घटनेत पेट्रोल टाकणाऱ्या व्यक्तीसह 11 जण भाजले असून दोनजण गंभीर आहेत. या प्रकारानंतर महापालिकेच्या विद्युत विभागाने घटनेचा प्राथमिक अहवाल अतिरिक्त आयुक्तांना सादर केला आहे. यात घटनेचे खापर मृताच्या नातेवाईकांवर फोडले आहे. विशेष म्हणजे, ही घटना सायंकाळी सहा वाजता घडलेली असताना रात्री नऊपर्यंत ती विद्युत विभाग, अग्निशमन दल अथवा पालिकेच्या आरोग्य विभागास माहितीच नव्हती. तसेच, या ठिकाणी एक सुरक्षारक्षक आणि पालिकेचा एकच कर्मचारी असताना त्यांच्याकडूनही सुरक्षेत त्रुटी निर्माण झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत असताना विद्युत विभागाने मात्र या प्रकाराचे खापर मृताच्या नातेवाईकांवर फोडत गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे.
स्मशानभूमी सुरक्षा वाऱ्यावर
स्मशानभूमीची जबाबदारी आरोग्य आणि विद्युत विभागाकडे विभागून असल्याने शहरातील सर्व प्रमुख 20 स्मशानभूमींची सुरक्षा रामभरोसे आहे. या स्मशाभूमीत कर्मचारी पुरविण्यासाठी तसेच दैनंदिन कामकाजासाठी महापालिकेकडे कर्मचारी नसल्याचा जावई शोध लावत पालिकेने सर्व स्मशाभूमींचा कारभार खासगी ठेकेदारांच्या हातात दिला आहे. त्यांच्याकडून पैसे वाचविण्यासाठी मोजकेच कर्मचारी नेमले जातात. हे कर्मचारी दैनंदिन अंत्यविधी, स्वच्छता तसेच इतर कामे वेळेवर करत नाहीत. काही दिवसांपूर्वी वैकुंठ स्मशानभूमीच्या कारभाराबाबतही अशाचप्रकारे तक्रारी आल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून त्यावर काहीच करण्यात आले नाही.
अग्निशमन यंत्रणा बसविणार
या प्रकारानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने स्मशानभूमी परिसरात अशाप्रकारच्या घटना घडल्यास जिवितहानी रोखण्यासाठी त्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा, पाण्याचे नळ, अग्निरोधक यंत्रणा, वाळूच्या बादल्या तसेच स्मशानभूमीत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. प्रशासनाने केलेल्या अहवालात, दुर्घटना झाल्यानंतर गोंधळ उडाला त्यावेळी एकच सुरक्षारक्षक तेथे होता. त्याला गर्दी नियंत्रित करता आली नाही. तसेच अनेक नागरिकांनी आपली वाहने स्मशानभूमीसमोरच लावल्याने दुर्घटनेनंतर आतमध्ये रुग्णवाहिका पोहचू शकल्या नाहीत. त्यामुळे या भाजलेल्या नागरिकांना उचलून रुग्णवाहिकेपर्यंत आणण्यात आले. तसेच या ठिकाणच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला अशा दुर्घटनेनंतर प्राथमिक उपचाराचीही माहिती नसल्याचे समोर आले आहे.





