Pune : सीबीएसई शाळांमध्ये सीसीटीव्हीची सक्ती

पुणे – बदलापुरमधील शालेय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमिवर सीबीएसई बोर्डाने आपल्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे सक्तीचे केले आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे दृक्-श्राव्य रेकॉर्डिंगची क्षमता असलेले उच्च दर्जाचे असतील. प्रसाधन, स्वच्छतागृहे वगळून सर्वत्र कॅमेरे बसविले जातील. त्यात रेकॉर्डिंग १५ दिवसांपर्यंत साठवण्याची क्षमता असेल.
बदलापूर घटनेनंतर राज्य सरकारने शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक केले आहे. विद्यार्थ्यांच्या भावनिक, मानसिक आरोग्याचे रक्षण करणे शाळेची जबाबदारी असते. त्याअनुषगांने सीबीएसई बोर्डाचे सचिव हिमांशु गुप्ता यांनी नवी नियमावली जारी केली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सुरक्षा नियमानुसार शाळांमध्ये सीसीटीव्हीची नियमित देखभाल अत्यावश्यक आहे. सीबीएसईचा निर्णय सर्व शाळांनी काटेकोर पाळावा लागणार आहे.
सीबीएसई बोर्डाच्या तरतुदीनुसार, प्रवेशद्वार, बाहेर पडण्याच्या जागा, प्रत्येक मजल्यावरील मोकळी जागा, जिने, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, कॅन्टीन, स्टोअर रूम, खेळाचे मैदान तसेच सर्व सामायिक जागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे.




